बार्शी विशेष : बार्शी शहर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत कोट्यावधी रुपयांच्या प्रतिबंधित गुटखा, पानमसाल्याचे घबाड पोलिसांच्या हाती लागले.
पोलिसांना मिळालेल्या बातमीनुसार, शनिवार दि. २९ एप्रिल २०२३ रोजी रात्री बार्शी लातूर रस्त्यावरील एमआयटी कॉलेज जवळ अंधारात उभ्या असलेल्या ट्रकची शहर पोलिस पथकाने चौकशी केली. ट्रकमध्ये काय माल भरला आहे याची विचारणा केली असता, आत बसलेल्या दोन इसमांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली.
त्यावेळी पोलिसांनी ट्रकसह दोन इसमांना ताब्यात घेऊन बार्शी शहर पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली. तेव्हा सदर ट्रकमध्ये हिरा पानमसाल्याच्या ३९० गोण्या व रॉयल तंबाखूच्या २०० गोण्या याप्रमाणे सुमारे ७६ लाख ७० हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा एकूण ५९० गोण्यात भरलेला आढळून आला. पोलिसांनी २५ लाख रुपये किंमतीच्या ट्रकसह (क्र. केए-५६-०१४४) एकूण १ कोटी १ लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाईबाबत अन्न व औषध प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक संतोष गिरीगोसावी, सपोनि सुधीर तोरडमल, सपोनि ज्ञानेश्वर उदार, पोसई कर्णेवाड, पोसई शिरसट तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे शैलेश चौगुले, अमोल माने, मनिष पवार, वैभव ठेंगल, ज्ञानेश्वर घोंगडे, अर्जुन गोसावी, रविकांत लगदिवे, अविनाश पवार व अंकुश जाधव यांनी केली.
