डीसीसी बँकेत चोरी; कॉम्प्युटर आणि फाईल्स आगीत जळाले

Admin
0

 

Theft at DCC Bank; Computers and files were destroyed in the fire

बार्शी विशेष : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बार्शीतील शिवाजीनगर शाखेतून कडी कोयंडा उचकटून,  १६ हजार रुपयांची चिल्लर चोरीस गेली. तसेच आगीमध्ये बँकेतील कागदपत्रे व वस्तू जळाल्यामुळे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना दि. २७ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६ ते २८ फेब्रुवारीच्या सकाळी १० च्या दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद बँकेच्या शाखा प्रमुख फरियाल रहिम शेख (वय ५०) रा. पाटील प्लॉट, शिवाजी नगर, बार्शी यांनी शहर पोलिसांत दिली आहे. 

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ फेब्रुवारीच्या सकाळी १० वाजता बँकेतील शिपाई पाटील यांनी फोन करून बँकेतून धूर येत असल्याचे त्यांना सांगितले. शेख बँकेत गेल्या तेव्हा धूर येत असलेला पाहून त्यांनी, मुख्य शाखाधिकारी शिवकुमार गाढवे यांना फोन करून सांगितले. थोड्या वेळात शिवकुमार गाढवे आल्यानंतर सर्वांनी पाहणी केली तेव्हा, बँकेच्या लाकडी दरवाजाचा कडी कोयंडा उचकटलेला दिसला. दुसऱ्या दाराचे कुलूप उघडून आत गेल्यावर सर्वत्र धूर दिसत होता. तेथील काँप्युटर, डीव्हीआर, बँकेतील महत्वाची कागदपत्रे व फाईल्स जळालेल्या दिसल्या. स्ट्राँग रुममधील लहान तिजोरी उघडी होती व त्यामधील १० रुपयांची १६ हजार रुपये किंमतीची नाणी चोरीस गेल्याचे दिसून आले. तसेच बँकेतील वस्तू व कागदपत्रे आगीमध्ये जळून १५ हजार रुपयांचे नुकसान झाले.

सदर फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुध्द बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पुढील तपास सपोनि तोरडमल करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)