बार्शी विशेष : हुंड्यासाठी सासरच्या मंडळीकडून वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून, विवाहाला अडीच वर्षे पूर्ण होण्याच्या आतच विवाहितेने विष प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविली. ही हृदयद्रावक घटना बार्शी तालुक्यातील झरेगाव येथे घडली. सचिता अक्षय सोनटक्के असे मयत विवाहितेचे नाव आहे. मयत मुलीच्या पित्याने या घटनेची फिर्याद वैराग पोलिस ठाण्यात दिली आहे.
रमेश नारायण पोंदे (वय ५२) रा. कामेगाव, ता.जि. धाराशिव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची धाकटी मुलगी सचिताचा विवाह दि. ३० ऑक्टोबर २०२० रोजी झरेगाव येथील अक्षय विठ्ठल सोनटक्के यांचेशी झाला. सुरुवातीचे दोन तीन महिने चांगले वागविल्यानंतर, तुझ्या आई वडिलांनी लग्नात टीव्ही दिला नाही, दिलेला बेड खराब आहे, नविन एलसीडी टीव्ही व हुंडा म्हणून मोटरसायकल घेऊन ये अशा वेगवेगळ्या कारणावरुन शिवीगाळी, मारहाण करुन तिचा छळ सुरु झाला. त्यावेळी त्यांनी तिला दुसरा नविन बेड आणि एलसीडी टीव्ही घेऊन दिला होता.
काही दिवसानंतर पुन्हा वेगवेगळ्या कारणावरुन तिचा छळ सुरुच राहिला. याबाबत तिने त्यांना फोन करुन सांगितले असता, त्यांनी वाद होत असतात, तू मनाला लावून घेत जाऊ नको, काही बोलले तरी शांत रहात जा असे समजावून सांगितले होते.
मागील महिन्यात तिच्या सासूने मुलीला घेऊन जा म्हणून त्यांना बोलावून घेतले, त्यावेळी झरेगावला गेल्यावर त्यांनी मुलीला बाजूला घेऊन विचारपूस केली असता, तिने इथे सतत छळ होत असून, चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करतात, तुम्हाला फोन केला तर माझा फोन सगळ्यांशी जोडून मी काय बोलते ते ऐकत असतात, त्यामुळे मी तुम्हाला फोन केला तरी याबाबत काहीही बोलले नव्हते असे सांगितले.
त्यावेळी नातू व मुलीला माहेरी नेतो असे तिच्या सासूला त्यांनी सांगितले असता, फक्त मुलीला घेऊन जा तिच्या मुलाला (वय ११ महिने) इथेच ठेवायचे असे बजावल्यामुळे ते मुलीला न आणताच परत आले.
दि. १८ मार्च २०२३ रोजी मुलीचा त्यांना फोन आला, आबा तुम्ही झरेगाव येथे येऊन मला माहेरी घेऊन चला, मला इथे खूप त्रास आहे, तुम्हाला हुंडा म्हणून मागितलेली मोटरसायकल तुम्ही अजून दिलेली नाही, तुम्ही माझ्या मरणाची वाट पाहात आहात काय असे ती म्हणाल्यामुळे, तिला काय झाले म्हणून विचारत असतानाच, तिच्या सासूने तिचेकडून फोन काढून घेऊन, तिला दिवस गेलेले आहेत, तिला घेऊन जा आणि खाली करुन घ्या, आमचे मागे शेतात खूप कामे आहेत असे म्हणून फोन कट केला.
त्यामुळे ते मुलीला एक दोन दिवसात आणायला जाणार होते, एवढ्यात दि. १९ मार्च २०२३ रोजी दुपारी २ वाजता तिच्या नवऱ्याने फोन करुन सचिताने विष पिले आहे, तिला धाराशिव येथे दवाखान्यात नेत असून तुम्ही तिथेच या असे सांगितले, व पुन्हा फोन करुन दवाखान्यात नेत असतानाच सचिता मरण पावल्याचे सांगितले.
रमेश पोंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सासू किसकिंदा सोनटक्के, पती अक्षय सोनटक्के व दीर अजय सोनटक्के (सर्व रा. झरेगाव, ता. बार्शी) यांचेविरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
