बार्शी विशेष : भवानी पेठेतील एका हॉस्पिटलशेजारी लावलेली मोटरसायकल भरदिवसा चोरीला गेली. याबाबतची फिर्याद मल्हार नागनाथ साखरे (वय ४९) रा. पाटील चाळ, तुळजापूर रोड, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
पोलिस लाईन समोरील रस्त्यालगत साखरे यांचे मोबाईल शॉप आहे. त्यांनी दुकानात जाताना, भवानी पेठेतील एका हॉस्पिटल शेजारी मोकळ्या जागेत हँडल लॉक करून लावलेली मोटरसायकल (क्र. एमएच-१३-बीएच-४०१९) भरदिवसा चोरीला गेली. ही घटना दि. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ च्या दरम्यान घडली.
बार्शी शहरातून यापूर्वी रात्रीतून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना घडत होत्या, मात्र आता अलिकडच्या काही दिवसांपासून शहरातून भरदिवसा वर्दळीच्या भागातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे कुणाची दुचाकी कोठून आणि कधी चोरीला जाईल याचा नेम राहिलेला नाही.सुमारे पंधरा दिवसांपूर्वी बार्शी शहर पोलिसांनी दोन दुचाकी चोरांना अटक करून त्यांच्याकडून काही वाहने जप्त केली होती. त्यामुळे दुचाकी चोरीच्या घटनांना आळा बसेल असे वाटत असतानाच, आता दुचाकी चोरांनी भरदिवसा वाहने चोरण्याचा सपाटा लाऊन पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे.
