बार्शी विशेष : रात्र गस्त घालताना थांबवलेल्या एका टेंपोतून कत्तलीसाठी भरून चालवलेल्या गोवंशाच्या जनावरांची वैराग पोलिसांनी सुटका केली, टेंपो चालक मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाला.
पोकॉ सुहास पवार व पोहेकॉ अलाट हे दि. १४ फेब्रुवारीच्या रात्री नऊचे सुमारास वैराग शहरात गस्त घालत असताना त्यांना, शिवाजी चौकात माढा रस्त्याकडून एक पिकअप टेंपो येताना दिसला. त्याला थांबण्याचा इशारा करताच टेंपो थाबवून चालक अंधाराचा फायदा घेत पळून गेला, त्याचा पाठलाग करूनही पोलिसांना चकवा देण्यात तो यशस्वी झाला.
सदर पिकअप टेंपो (क्र. एमएच-११-टी-२४७०) ची पाहणी केली असता, त्यामध्ये गोवंशाची जनावरे भरलेली दिसली. तेव्हा गोरक्षकांच्या मदतीने पोलिसांनी सदर टेंपो ताब्यात घेतला.
या टेंपोत क्षमतेपेक्षा जास्त, दाटीवाटीने २ मोठ्या जर्सी गायी व ३५ लहान वासरे, त्यांना वेदना होईल अशा अरूंद जागेत, हालचाल करता येणार नाही अशा पध्दतीने, तसेच त्यांच्या चारापाण्याची व औषधाची कोणतीही सुविधा नाही अशा पध्दतीने अमानुषपणे, निर्दयीपणे कोंबून भरलेली दिसली. ३५ वासरांपैकी ५ वासरे मयत झाल्याचे दिसून आले.
सदर गोवंशाची जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची खात्री झाल्याने, त्यांना टेंपोसह पोलिस ठाण्यात आणून, गाय, वासरांना कारंबा येथील अहिंसा गोशाळेकडे सुपूर्द करण्यात आले.
पोकॉ सुहास पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, वैराग पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैराग पोलिसांनी अवघ्या २४ तासात ही दुसरी कारवाई करून, कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या गोवंशाची सुटका केली आहे. दि. १३ फेब्रुवारी रोजीही एक टेंपो पकडून त्यामधील गोवंशाच्या जनावरांची वैराग पोलिसांनी सुटका केली होती.
