![]() |
निंदनीय
(संपादकीय, बार्शी विशेष १९ जानेवारी २०२३)
काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेले बार्शीच्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थिनींसोबत घडलेले गैरप्रकार अत्यंत धक्कादायक आणि निंदनीय आहेत. गुरू शिष्यांच्या पवित्र नात्याची लक्ष्मणरेषा ओलांडणारे हे प्रकार संतापजनक तर आहेतच, पण यामुळे शिक्षकांवर आणि शाळेवर पूर्णतः विश्वास टाकणाऱ्या पालकांची यामुळे झोप उडाली आहे.
एका विद्यार्थीनीला शिक्षकाने दिलेल्या धमकीमुळे घाबरलेल्या त्या विद्यार्थीनीने दाखविलेल्या धाडसामुळे गैरप्रकार उघडकीस आले. त्यानंतर त्या शिक्षकास अटक झाली, त्याच्या व संबंधित इतरांच्या चौकशीतून आणखी काही गैरकृत्ये घडली असतील तर तीही उजेडात येतील. यामुळे ती शाळा सध्या बंदच आहे.
काही संघटनांनी याविरूध्द आक्रमक होत शाळेची मान्यता रद्द करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. काही संघटनांनी विना कारवाई शाळा सुरू केल्यास तोडफोडचा इशारा दिलेला आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेत या प्रकरणाचा तपास वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे.
दोषींवर कठोर कारवाई तर झालीच पाहिजे याबद्दल कुणाचेही दुमत नाही. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तेव्हा या सगळ्या बाजूंचा विचार होऊन योग्य मार्ग निघणे गरजेचे आहे.
अशा प्रकाराबाबतचे वृत्तांकन करताना कोणत्याही प्रकारे पीडीतांची ओळख उघड होऊ नये म्हणून माध्यमांना जी कायदेशीर बंधने आहेत ती पाळावीच लागतात. माध्यमांकडून याचे पालन होत असताना काहीजण नाव का प्रसिध्द करत नाहीत असा प्रश्न उपस्थित करतात. त्यांनी आणि सगळ्यांनीच यासंदर्भातील वस्तुस्थिती लक्षात घ्यावी. काही स्त्रोतातून कुणाला जरी नावे समजली असतील तरीही, समाजमाध्यमांवर व्यक्त होताना जबाबदारीचे भान सगळ्यांनीच पाळावे. कायद्याचे बंधन तर सर्वांना आहेच, पण थोडावेळ तेही बाजूला ठेवले तरीही आपण ज्यांना जीवापाड जपतो, ज्यांचे लाड करतो अशा कोमल कळ्या आपल्याही घरात उमललेल्या आहेत याची जाणीव ठेवली तर कायद्याची गोष्ट सांगण्याची आवश्यकताच भासणार नाही.
