सोनोग्राफी केंद्रांची काटेकोर तपासणी करावी : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

Admin
0


जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीत दिले निर्देश  

सोलापूर (जि. मा. का.) : गर्भधारणा व प्रसूतीपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत सोनोग्राफी केंद्रांची काटेकोर तपासणी करावी. स्त्री भ्रृण हत्या रोखण्याच्या अनुषंगाने सोनोग्राफी सेंटर व एमटीपी सेंटरची तपासणी धडक मोहीम कायम ठेवावी. तसेच नागरिकांमध्ये अधिकाधिक जनजागृती निर्माण करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिल्या.

पीसीपीएनडीटी जिल्हा दक्षता समितीच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. पी. कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी, जिल्हा पर्यवेक्षक कृष्णा सकट, डॉ. अग्रजा चिटणीस, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रदीप राऊत, पोलीस उपनिरीक्षक (सोलापूर ग्रामीण) सोनाली गोडबोले, सामाजिक कार्यकर्ता अमित महाडिक, मंजुश्री मुळे आदि उपस्थित होते.

यावेळी मुले व मुलींचा जन्मदर, सोनोग्राफी केंद्रांची सद्यस्थिती, एमटीपी केंद्रांची सद्यस्थिती, एआरटी व सरोगसी कायद्याची अंमलबजावणी, गत बैठकीतील सूचनांवर केलेली कार्यवाही,  बार्शीत घेण्यात आलेली कार्यशाळा, पुढील कृतीनियोजन, महापालिकेच्या वतीने जनजागृती कार्यक्रम, सोनोग्राफी सेंटर्सची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया, कोर्ट केसेस आदि बाबींचा आढावा घेण्यात आला.

एचआयव्ही बाधित वाढू नयेत, यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना

जिल्ह्यातील एचआयव्ही बाधितांची संख्या गत ५ ते ६ वर्षे स्थिर आहे. नवीन रूग्णसंख्या वाढू नये, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी. तपासण्यांचे प्रमाण वाढवावे, औषधांची कुठलीही कमतरता पडू नये, यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिल्या. जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण, एचआयव्ही/टीबी बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या बैठकीत एचआयव्ही रूग्णांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा, एचआयव्ही बाधितांची सद्यस्थिती, करण्यात येणाऱ्या तपासण्या, एआरटी सेंटर्स, अशासकीय संस्थांची कामगिरी, रक्त पेढ्यांतील रक्त संकलन आदि बाबींचा आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी, पोलीस, समाज कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचाही घेतला आढावा

दरम्यान, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत घेतला. यावेळी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी अन्न व औषध विभागाने कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच, शासकीय कार्यालयांमध्ये असे पदार्थ सेवन केले जाणार नाहीत, याची दक्षता कार्यालयप्रमुखांनी घ्यावी, असेही ते म्हणाले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)