![]() |
| jewellery stolen from purse; Incident at Barshi bus stand |
बार्शी विशेष : परिक्षेचा पेपर देण्यासाठी माहेरी आलेल्या विवाहितेच्या पर्समधून ८३ हजार रुपये किंमतीचे दागिने पळविल्याची घटना दि. ७ जुलै रोजी बार्शीच्या बस स्थानकात घडली.
निशा अर्जुन नलवडे (वय २१), रा. जावजी बुवाची वाडी, ता. दौंड, जि. पुणे यांनी यासंदर्भात बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यांचे बी.ए. चे पेपर असल्याने त्या आईसोबत माहेरी पानगांव, ता. बार्शी येथे जाण्यासाठी दि. ७ जुलै रोजी यवतहून बार्शीला आल्या होत्या. सकाळी साडेसहा वाजता पानगांव येथे जाण्यासाठी सोलापूर बसमध्ये चढल्यानंतर त्यांना पर्सची चेन उघडी असून पर्सा हलकी लागत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पर्स तपासून बघितली असता, त्यामध्ये ठेवलेले २० ग्रॅम सोन्याचे गंठण, अर्धा ग्रॅमची नथ व चांदीचे दोन बिचवे असे एकूण ८३ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. तोपर्यंत बस बरीच पुढे गेलेली असल्यामुळे पानगांव येथे उतरुन पुन्हा बार्शी बसस्थानकावर येऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु दागिने मिळून आले नाहीत, त्यामुळे त्यांनी यासंदर्भात बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
