चाकूच्या धाकाने रोकड व सोन्याचा ऐवज लुटला; अकरा दिवसांतील दुसरी घटना

Admin
0

 

https://www.barshivishesh.in
looted cash and gold with showing a knife; The second incident in eleven days

वैराग (बार्शी विशेष) : तुळजापूरहून दर्शन करुन गांवाकडे येणाऱ्या मोटरसायकलस्वाराला अडवून त्याच्याकडील पन्नास हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली. गेल्या अकरा दिवसांतील वैराग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही दुसरी घटना आहे.

सुखदेव फरिदा मस्के (वय ४०) रा. अंबाबाईची वाडी, ता. बार्शी यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. दि. १७ जून रोजी मोटरसायकल क्र. एमएच-१३-एएक्स-३२५० वरुन तुळजापूरहून दर्शन करुन ते त्यांची पत्नी व मुलगा गांवाकडे परत येत असताना, रात्री ९ चे सुमारास रुई गांवाच्या पुढे मुलाणी यांच्या शेताजवळील रस्त्यावर चार अनोळखी इसमांनी त्यांची मोटरसायकल अडवली, आणि चावी काढून घेत चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील रोख रक्कम अडीच हजार रुपये, पांच हजार रुपये किंमतीचा मोबाईल, पत्नीच्या गळ्यातील ४० हजार रुपये किंमतीचे १० ग्रॅम सोन्याचे मणी मंगळसूत्र, पांच हजार रुपये किंमतीचे १ ग्रॅम सोन्याचे कानातील झुबे असा एकूण ५२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून ते चोरटे रुई गांवाच्या दिशेने पसार झाले. याबाबत वैराग पोलिस ठाण्यात चार अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

दि. ६ जून रोजी सुध्दा तीन चोरट्यांनी अशाच पध्दतीने मोटरसायकलवरुन गांवाकडे जाणाऱ्या दांपत्याला अडवून गाडीची चावी काढून घेऊन मोबाईल व महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली असून, त्याबाबतचा गुन्हा वैराग पोलिस ठाण्यात दाखल आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)