![]() |
| Armed attack on a young man who broke into a house in Barshi |
बार्शी : गोळीबाराचा गुन्हा दाखल झाल्याच्या रागातून बार्शीतील तरुणावर घरात घुसून हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री घडली. विश्वेश्वर उर्फ पिल्या दिलीप लंगडे (वय २३) रा. वाणी प्लॉट, बार्शी याने याबाबतची फिर्याद दिली आहे.
त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवार दि. ५ मे रोजी मी माझ्या घरात कुटुंबासह टीव्ही बघत बसलेलो असताना, रात्री आठचे सुमारास प्रशांत उर्फ सोन्या हाजगुडे, श्रीरंग वीर व ज्ञानेश्वर वीर हे तिघे माझ्या घरात घुसले. प्रशांत उर्फ सोन्या हाजगुडेच्या हातात कोयता, श्रीरंग वीरच्या हातात काठी तर ज्ञानेश्वर वीरच्या हातात तलवार होती.
त्यावेळी सोन्या हाजगुडे मला म्हणाला, तुझ्यामुळेच माझ्यावर गोळीबाराचा गुन्हा दाखल झाला आहे, तुला आता आम्ही जिवंत सोडत नसतो असे म्हणून हातातील कोयता माझ्या डोक्यात मारला, तो चुकवून मी घरातून बाहेर जात असताना श्रीरंग वीरने माझ्या पाठीत काठीने मारले, तसेच ज्ञानेश्वर वीरने तलवारीचा वार करण्याचा प्रयत्न केला असता तो चुकवून मी घराबाहेर पळालो.
माझी आई मला वाचविण्यासाठी आरडाओरडा करत असताना सोन्या हाजगुडे व ज्ञानेश्वर वीर यांनी माझ्या आईला ढकलून तिची साडी ओढली, ब्लाऊझ फाडला. तसेच माझ्या बहिणीला श्रीरंग वीरने शिवीगाळी व मारहाण केली, त्यावेळी बहिणीने त्यास ढकलले असता, तो खाली पडल्याने त्याच्या डोक्यास मार लागला.
सोन्या हाजगुडे याने माझ्या वडिलांची गच्ची धरुन पिल्या कुठे पळून जातो ते मी बघतो, त्याला मी आता जिवंत सोडत नसतो असे म्हणून माझ्या आई वडिलांना शिवीगाळी करत निघून गेला.
यापूर्वी सुध्दा सोन्या हाजगुडेने माझ्या मोबाईलवर फोन करुन, तुझ्या नांवाचा कोयता मी माझ्याकडे ठेवला आहे, तू जास्त नाटक केले तर तुला त्याच कोयत्याने मारुन टाकीन अशी धमकी दिली होती.
या फिर्यादीनुसार बार्शी शहर पोलिस ठाण्यात वरील तिघांविरुध्द भा.दं.वि. १८६० कलम ३०७, ३४, ४५२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
