| Jawan dies after being buried under snow flake |
गोंदिया : मराठा रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेले, गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील चिरेखनी येथील महेंद्र भास्कर पारधी (वय ३७) या जवानाचा अरुणाचल प्रदेशामध्ये होत असलेल्या हिमवृष्टीमुळे बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला.
अरुणाचल प्रदेशच्या दुर्गम भागात सहा जवान पेट्रोलिंग करीत होते. त्यापैकी एक हवालदार महेंद्र पारधी होते. पेट्रोलींग दरम्यान अती जोरदार हिमवृष्टी होत होती. अंधारलेल्या वातावरणामुळे रस्ते दिसत नव्हते. सर्वांचा एकमेकांशी संपर्क तुटला होता, रस्ते सापडत नव्हते. अशा तूफानी व ढगाळ वातावरणात हे जवान अडकले होते. त्यातच हिमवृष्टी होत असलेल्या बर्फाच्या ढिगाऱ्यात दबून त्यांचा मृत्यू झाला.
ही दुःखद घटना मंगळवार दि. २२ मार्च रोजी अरुणाचल प्रदेश (दिब्रूगड) येथे घडली. या घटनेमुळे चिरेखनी गाव शोकसागरात बुडाले आहे.
महेंद्र पारधी यांचा जन्म चिरेखनी येथे सन १९८५ मध्ये झाला. शिक्षण चिरेखनी व तालुका तिरोडा येथे झाले. ते सन २००४ मध्ये बेलगाम मराठा सेंटरमध्ये (कर्नाटक) येथे हवालदारपदी रुजू झाले होते. या पदावरील कर्मचार्यांना २४ वर्षे सेवा द्यावी लागते व त्यानंतर ते सेवानिवृत्त होतात. मात्र, महेंद्र पारधी यांच्या सेवानिवृत्तीला तब्बल ८ वर्षे बाकी असतानाच काळाने घाला घातला.
उद्या गुरुवार दि. २४ मार्च रोजी त्यांचे पार्थिव चिरेखनी येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
महेंद्र यांच्या पत्नीचे नाव गायत्री असून, त्यांना जानव (वय १०) व शिवाय (वय ४) नावाची दोन मुले आहे. देशसेवा करताना महेंद्र शहीद झाल्याने या चिमुकल्यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र कायमचे हरपले आहे.