ओळखीच्या महिलेने मिनी गंठण लंपास केल्याचा संशय; बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल

0

 

llustration of a woman discovery a theft from a cupboard in Barshi.
दागिन्यांची चोरी; बार्शीतील घटना

बार्शी विशेष : घरातील कपाटात ठेवलेले ५२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठण चोरीला गेले. याप्रकरणी फिर्यादी अर्चना श्रीराम सांगळे (वय ३८) रा. भिसे प्लॉट, आगळगांव रोड, बार्शी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, एका ओळखीच्या महिलेवर संशय व्यक्त केल्यावरुन त्या महिलेविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 


फिर्यादींची मुलगी पाहुण्याच्या लग्नानिमित्त बार्शीत आली होती. त्यावेळी तिने तिचे १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण आईकडे कपाटात ठेवण्यासाठी दिले होते. मुलीचा मेकअप करण्यासाठी फिर्यादीने ओळखीच्या सुप्रिया जगदीश मगर-कवडे, रा. बारंगुळे गल्ली, कसबा पेठ, बार्शी यांना १५ मार्च २०२६ रोजी सकाळी दहाचे सुमारास आपल्या घरी बोलावले होते. मुलींचा मेकअप केल्यानंतर सुप्रिया मगर या साडेअकराच्या दरम्यान घरातून निघून गेल्या, व त्यानंतर १० ते १५ मिनीटांनी पुन्हा घरी आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 


त्यानंतर काही वेळाने फिर्यादी व त्यांच्या मुलीने मिनी गंठण घेण्यासाठी कपाटातील दागिन्यांचा डबा तपासला असता त्यातील गंठण चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात शोधूनही न मिळाल्यामुळे त्यांनी फोन करुन पोलिसांना घरी बोलावून घेतले. पोलिसांनीही शोध घेतला असता गंठण मिळून आले नाही.


या घटनेनंतर पोलिसांनी सुप्रिया मगर यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचेकडे चौकशी करुन अंगझडती घेतली. मात्र गंठण मिळून आले नाही. फिर्यादीने सुप्रिया मगर यांचेवर संशय व्यक्त करुन तक्रार देताच पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०५ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण साठे करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)