बार्शी विशेष : दोन मिनिटांच्या भाषणाने स्वामी विवेकानंद यांनी आख्ख जग जिंकलं आपल्याकडे तर सात मिनिटे आहेत. त्यामध्ये आपण महापुरुषांच्या विचारांची पेरणी करत अनेक जणांच्या मनामध्ये घर करू असे उद्गार स्मार्ट अकॅडमीचे संचालक सचिन वायकुळे यांनी काढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त, क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषक वितरण समारंभात ते बोलत होते. पुढे बोलताना वायकुळे यांनी भाषण कौशल्य या विषयावर प्रकाश टाकत, भाषण कौशल्याची सूत्र, मांडणी, आशय, विषय, निष्कर्ष सादरीकरण आदी पैलू उपस्थितांना आपल्या शैलीमध्ये सांगत वक्तृत्वाचे महत्त्व पटवून दिले.
बार्शीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
बार्शी शहर आणि तालुक्याला शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि कलाक्षेत्राची मोठी जुनी परंपरा लाभलेली आहे. आतापर्यंत बार्शी मध्ये अनेक दिग्गज मान्यवर येऊन गेलेले आहेत. क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून, महापुरुषांच्या विचारांचा जागर करत वक्त्यांना एक चांगले व्यासपीठ निर्माण करून दिले असल्याचे सांगून, बार्शीच्या या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील वक्ते, भविष्यात महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उच्चस्थानी चमकतील व बार्शीच्या वक्तृत्व स्पर्धा कायम त्यांच्या स्मरणात राहतील असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार शितोळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यातून ५५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी २१, १३२, १५, १३२ व १०, १३२ रुपये तर उत्तेजनार्थ ५, १३२ रुपये रोख तसेच सर्वांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तक देऊन गौरविण्यात आले. तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
विजेते स्पर्धक (विभागून) याप्रमाणे : (प्रथम पारितोषिक : संकेत पाटील, गडहिंग्लज कोल्हापूर व यश पाटील, मुंबई) (द्वितीय पारितोषिक : हर्षवर्धन आलासे, पुणे व प्रसाद लोखंडे, कोल्हापूर) (तृतीय पारितोषिक : श्राविका जाधव, आगळगांव बार्शी व अथर्व खरे, वाई, सातारा) (उत्तेजनार्थ पारितोषिक : तीर्थराज इंगळे, जामनेर जळगांव व शितल वाघमारे, करमाळा)
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार शितोळे होते, तर विचार मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, माजी विरोधी पक्षनेते विजय राऊत, मराठा सेवा संघाचे किरण गाढवे, विश्व हिंदू परिषदेचे बापूसाहेब कदम, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे, कलायात्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण गाढवे, पत्रकार गणेश गोडसे, चाटे कोचिंग क्लासेसचे घाडगे सर, माजी नगरसेवक शंकर देवकर, माधवराव देशमुख, अॅड. अलाट, पत्रकार उमेश पवार, सुमित कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमासाठी पत्रकार बांधव व श्रोते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दलित महासंघाचे बार्शी शहराध्यक्ष संदीप आलाट व व्याख्याते मंगेश दहीहांडे यांनी या वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून, तर टाईम कीपर म्हणून अबोली दीक्षित-पालके यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष धिरज शेळके, सूत्रसंचालन सुवर्णा देवकर तर उपस्थितांचे आभार आभार प्रवीण भडके यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अजय कांबळे, आतिश पालके, परमेश्वर चांदणे, जगन्नाथ जाधव, गणेश राजपूत, गणेश इंगोले, प्रतिज्ञा गायकवाड, विकी गोंदकर आदींनी अथक परिश्रम घेतले.

.jpeg)