![]() |
| Bhagyashree Keskar and Prakash Lavand will get Meghdoot Award |
बार्शी विशेष : येथील कवी कालिदास मंडळाच्या वतीने दरवर्षी कवी कालिदास दिनाचे औचित्य साधून कवीच्या पहिल्या काव्यसंग्रहास मेघदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीच्या मेघदूत पुरस्कारासाठी भाग्यश्री केसकर व प्रकाश लावंड यांची निवड झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे यांनी दिली.
गेली दोन वर्षे कोविडमुळे सार्वजनिक कार्यक्रम न झाल्याने, यावर्षी सन २०२० व २०२१ अशा दोन वर्षातील प्रत्येकी एक, असे दोन उत्कृष्ट काव्यसंग्रह निवडण्यात आले. उस्मानाबाद येथील कवयित्री भाग्यश्री केसकर यांच्या 'उन्हानं बांधलं सावलीचं घर' (सन २०२०) व करमाळा येथील कवी प्रकाश लावंड यांच्या 'काडवान' (सन २०२१) या काव्यसंग्रहांची मेघदूत पुरस्कारासाठी निवड झाली असून, रविवार दिनांक १० जुलै रोजी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजेंद्र दास यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली मातृ मंदिर, ढगे मळा येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या तिसाव्या कवी कालिदास महोत्सवात मेघदूत पुरस्काराचे वितरण होणार आहे. तरी या कार्यक्रमास साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक पं. ना. कुलकर्णी व कवी प्रकाश गव्हाणे हे सदर पुरस्कारांचे प्रायोजक आहेत. कालिदास महोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरणही या कार्यक्रमात होणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष प्रा.अशोक वाघमारे, उपाध्यक्ष जयसिंग राजपूत, सचिव चन्नबसवेश्वर ढवण, सहसचिव आबासाहेब घावटे, कोषाध्यक्ष गंगाधर अहिरे, शब्बीर मुलाणी, मुकुंदराज कुलकर्णी, प्रकाश गव्हाणे, डॉ.कृष्णा मस्तुद, डॉ. रविराज फुरडे, दत्ता गोसावी, सुमन चंद्रशेखर, शिवानंद चंद्रशेखर, संतोष पाठक आदी परिश्रम घेत आहेत.

