![]() |
| Fund of Rs. 20 crore sanctioned for Barshi Upsa Irrigation Scheme in Revised Estimates |
बार्शी विशेष : तालुक्यास वरदान ठरणाऱ्या बार्शी उपसा सिंचन योजनेचे काम निधी अभावी रखडलेले होते. सदर योजनेतील पंप हाऊस, मुख्य पाईप लाईन व २० कि.मी. पर्यंतची कामे पूर्ण झालेली असून, उपकालवे व पोट चाऱ्यांची कामे शिल्लक आहेत.
त्यामुळे योजनेचा लाभ होणारी गांवे पाण्यापासून वंचित राहत आहेत. या योजनेची सध्याची एकूण किंमत ६५० कोटी इतकी असून त्यावर २०० कोटी इतका निधी खर्च झालेला आहे. उर्वरीत शिल्लक कामांसाठी जवळपास ४५० कोटी इतक्या निधीची आवश्यकता आहे.
योजनेवर मंजूर अंदाजपत्रका इतका खर्च झालेला असल्याने, योजनेवर खर्च करण्यास परवानगी नसल्याने कामे ठप्प झालेली आहेत. सदर योजनेचे सुधारीत अंदाजपत्रक मंजूर झाल्याशिवाय ही कामे सुरु करता येणार नसल्याने, योजनेच्या सुधारीत अंदाज पत्रकास शासनाकडून मंजूरी प्राप्त करुन घेण्यासाठी आ. राजेंद्र राऊत यांच्याकडून शासन दरबारी सतत पत्र व्यवहार करून, वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत होता.
त्या पाठपुराव्यास यश येऊन शासनाने या योजनेच्या सुधारीत अंदाज पत्रकास मंजूरी दिलेली आहे. त्यामुळे उर्वरीत कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. या योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास मंजूरी मिळाल्याने उर्वरीत कामे लवकरच पूर्ण होऊन बार्शी व माढा तालुक्यातील १५ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येऊन सुजलाम-सुफलाम होणार आहे.
यावर्षी योजनेस २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगून, उर्वरीत वाढीव निधीसाठी सतत पाठपुरावा सुरु असल्याचे आ. राजेंद्र राऊत यांनी सांगितले.
