![]() |
| Action against striking ST workers; Decision to recruit 11,000 contract servants |
सतत आवाहन करुनही ३१ मार्चपर्यंत कामावर हजर झाले नाहीत अशा कामगारांवर नियमानुसार निलंबन, बडतर्फ तसेच सेवा समाप्तीची कारवाई करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. तसेच बेमुदत संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दणका देत ११ हजार कंत्राटी नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासहित विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी मागील पाच महिन्यापासून संपावर गेले आहेत. काही आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. संपाचा तिढा सोडवण्यासाठी परिवहन विभागाने सातत्याने प्रयत्न केले. परिवहन मंत्री अनिल परब यांनीही सतत आवाहन केले. परंतु, कर्मचारी ठाम आहेत. परिणामी ग्रामीण भागातील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाने ३१ तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मुदतीचा आज शेवटचा होता. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा करून कामगारांवर कारवाईचा निर्णय घेण्यात आल्याचे परिवहन मंत्री परब म्हणाले.
सध्या पाच हजार बसेस धावत आहेत. कंत्राटी कर्मचारी भरती केल्यास आठ हजार आसपास बसेस रस्त्यावर धावतील. आज कर्मचाऱ्यांना हजर राहण्याची मुभा संपत आहे. आज संध्याकाळपर्यंत किती कर्मचारी हजर झाले याचा अहवाल प्राप्त होईल. जे कर्मचारी हजर होतील, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही. मात्र, उद्या दि. १ एप्रिल पासून कारवाईचा बडगा उगारला जाईल. आतापर्यंत सात वेळा कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे. कर्मचारी सरकारचे आदेश झुगारून लावत आहेत. याचा अर्थ त्या कर्मचाऱ्यांना नोकरीची गरज नाही. त्यामुळे त्यांच्यावर नियमानुसार निलंबन, बडतर्फी किंवा सेवा समाप्तीची कारवाई केली जाईल, असे परब यांनी सांगितले.
