सौंदरे : अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बार्शी सोलापूर रस्त्यावरील सौंदरे गांवाजवळ शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.
शेतकऱ्यांनी वीजबिले न भरल्यामुळे वरिष्ठांकडून आलेल्या आदेशानुसार आम्ही वीजपुरवठा बंद केला असे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते, मात्र शेतकऱ्यांचा यांस तीव्र विरोध होता.
आधीच यापूर्वीच्या लॉकडाऊनच्या काळात दोन वर्षे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, आणि आता महावितरणकडून १० हजार रुपये वीजबिलापोटी भरण्याची मागणी होत आहे. परंतु ते भरण्याइतकी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, आता पिके हाताशी आलेली आहेत पाण्याअभावी त्याचे नुकसान होऊ नये, म्हणून महावितरणने आधी वीजपुरवठा सुरु करावा, शेतकरी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार सध्या दोन तीन हजार रुपये भरतील असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते. यावेळी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून त्यांच्या मागण्यांचे निवेदन महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.