मुळेगांव तांडा येथे 'परिवर्तनाची' सुरुवात

Admin
0

 

https://www.barshivishesh.in/

https://www.barshivishesh.in/

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतील
'परिवर्तनाची' मुळेगांव तांडा येथे सुरुवात

मुळेगांव तांडा/सोलापूर : सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या ऑपरेशन परिवर्तन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये हातभट्टी दारु उत्पादनासाठी कुप्रसिध्द असलेले मुळेगाव तांडा हे गांव स्वत: पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दत्तक घेतले होते. 

सदर गांवामध्ये पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारु उत्पादित करुन ती आजूबाजूच्या गांवामध्ये विक्रीसाठी पाठवली जात होती. परंतु तेजस्वी सातपुते यांनी सदरचे गाव दत्तक घेतल्यापासून सातत्याने छापा कारवाई करून गुन्हे दाखल केले होते.

त्याचबरोबर सदर दारु व्यवसाय करणाऱ्या लोकांना कायदेशीर व्यवसाय सुरु करुन उत्पन्नाचे साधन मिळणे आवश्यक होते. यासाठी तेजस्वी सातपुते, यांनी जिल्हा उद्योग केंद्र व मिटकॉनच्या माध्यमातून मुळेगाव तांडा येथील ४१ महिलांना शिलाई मशीन चालविणे व फॅशन डिझायानिंगचे ४५ दिवसाचे प्रशिक्षण दिले होते. 

सदरचे प्रशिक्षण जय गारमेंटस्, होटगी, ता. दक्षिण सोलापूर येथे पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षित महिलांनी स्वत:च्या गावात स्वत:चा उद्योग उभा करुन परिवर्तनाची नांदी सुरु करण्याची इच्छा व्यक्‍त केली होती.

हाच धागा पकडून तेजस्वी सातपुते यांनी सदर महिलांना गारमेंट व्यवसाय सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करुन देवून त्यातून अत्याधुनिक पध्दतीच्या १८ शिलाई मशिन खरेदी करुन दिल्या. 

मुळेगाव तांडा येथील महिलांनी सदर गारमेंट उद्योगाचे 'परिवर्तन उद्योग समूह'  असे नामकरण करुन त्यातून स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे.

या परिवर्तन उद्योग समूहासाठी एका प्रशस्त हॉलची गरज होती. मग त्यासाठी गांवातील ग्रामपंचायतीच्या मागील पडिक हॉलची दुरुस्ती बालाजी अमाईन्सच्या माध्यमातून करण्यात आली.

आणि आज २१ मार्च २०२२ रोजी मनोज लोहिया, विशेष पोलीस महानिरिक्षक कोल्हापूर परीक्षेत्र यांच्या हस्ते फित कापून सदर उद्योगाचा शुभारंभ करण्यात आला. 

कार्यकमाचे प्रास्ताविक तेजस्वी सातपुते यांनी केले. त्यामध्ये त्यांनी ऑपरेशन परिवर्तन या कार्यकमाचा उद्देश व आतापर्यंत झालेली वाटचाल याबाबत माहिती सांगून, मुळेगाव तांडा येथील परिवर्तनामध्ये सामाविष्ट झालेल्या महिला व गावकरी यांचे विशेष आभार मानले. 

यावेळी परीवर्तन उद्योग समूह सुरु करण्यासाठी मदत करणाऱ्या मान्यवरांचा व पोलीसांचा प्रशंसापत्र देवून सन्मान करण्यात आला. 

उपस्थित जनसमुदायास मनोज लोहिया, विशेष पोलीस महानिरिक्षक, कोल्हापूर, दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.सोलापूर, श्रीमती सुहासिनी शहा, अध्यक्षा, प्रिसीजन फाउंडेशन, सोलापूर, श्रीमती मनिषा आवळे, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सोलापूर यांनी मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमास सत्य साई कार्तिक, प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक, अमोल कुंभार, तहसीलदार दक्षिण सोलापूर आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात मुळेगाव तांडा येथील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)