![]() |
steals motorcycle in front of court at barshi |
बार्शी : बार्शी न्यायालयासमोर लावलेली मोटरसायकल चोरीला जाण्याची घटना घडली.
उस्मानाबाद येथील सुनिल बाजीराव पवार (वय ५१), रा.रामकृष्ण कॉलनी, उस्मानाबाद हे दाव्याची तारीख असल्यामुळे ६ एप्रिल २०२२ रोजी दुपारी बाराचे सुमारास मोटरसायकलवरुन बार्शी न्यायालयात आले होते.
त्यावेळी त्यांनी त्यांची काळ्या रंगाची बजाज डिस्कव्हर मोटरसायकल क्र. एमएच-२५ डब्ल्यू-६६२५ ही बार्शी न्यायालयासमोर हँडल लॉक करुन लावली होती.
न्यायालयात जाऊन वकिलासोबत चर्चा करुन ते बाहेर आले असता, त्यांनी जिथे मोटरसायकल लावली होती, तिथे दिसून आली नाही. तसेच आजूबाजूस शोध घेऊनही ती मिळून आली नाही. त्यावरुन ती चोरीस गेल्याची त्यांची खात्री पटल्याने त्यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
यापूर्वी बार्शी शहरांतून १ फेब्रुवारीला मंगळवार पेठेतून बागवान, १० फेब्रुवारीला तेलगिरणी चौकातून होनाळे , २ मार्चला उपळाई रोडवरुन रामगुडे, १२ मार्चला देशपांडे वाडा येथून आंबेकर, ६ एप्रिल रोजी पाटील प्लॉट येथून जगदाळे, १२ एप्रिलला राजमाता नगर, उपळाई रोड येथून मुळे यांच्या मोटरसायकल चोरीस गेलेल्या आहेत.