टेंपोमधून हत्येसाठी नेली जात असलेली गोवंशाची जनावरे जप्त; बार्शी तालुका पोलिसांची कारवाई

Admin
0

 

Seizure-of-cattle-being-transported-for-slaughter-from-Tempo-Action-of-Barshi-Taluka-Police

बार्शी विशेष : बार्शी तालुका पोलिसांनी टेंपोमधून हत्या करण्यासाठी नेण्यात येणाऱ्या गोवंशाची जनावरे जप्त करून तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एमएच-४२-६४४१ क्रमांकाच्या आयशर टेंपोमधून हत्या करण्यासाठी जनावरे नेली जात आहेत, त्यामुळे पानगांव येथे नाकाबंदी करा अशी सूचना बार्शी तालुका पोलिसांना, सोलापूर ग्रामिण नियंत्रण कक्षाकडून मिळाल्यानुसार, बार्शी तालुका पोलिसांनी पानगांव येथे जाऊन शोध सुरू केला तेव्हा सदर टेंपो कळंबवाडीच्या दिशेने गेल्याचे समजले. त्यामुळे पोलिस पथक तातडीने कळंबवाडीकडे रवाना झाले.

दि. २६ जानेवारी रोजी रात्री पावणे दोनचे सुमारास मौजे बावी (आ) ता. बार्शी येथील एसटी स्टँडजवळ पोलिसांनी सदर आयशर टेंपो थांबवून तपासणी केली. त्यावेळी टेंपोमध्ये अरूंद जागेत, दाटीवाटीने, मुसक्या आवळून, पाय बांधलेल्या अवस्थेतील जर्सी गायी, बैल अशी जनावरे भरलेली आढळून आली.

पोलिसांनी सदर टेंपो श्री नवकार जैन सेवा तीर्थ, अलीपूर येथील गोशाळेत आणून पंचासमक्ष जनावरे बाहेर काढून पंचनामा केला असता, ९ जर्सी गायी व एक बैल अशी जनावरे मिळून आली, त्यापैकी एक गाय व एक बैल मृतावस्थेत मिळून आले.

पोलिसांनी १) गुलाब खाजुभाई शेख (वय ३१) रा. आसू, ता. फलटण, जि. सातारा, २) रज्जाक महिबूब शेख (वय २५) रा. आसू, ता. फलटण, जि. सातारा व ३) सूरज रशिद शेख (वय २७) रा. दर्गा रोड, उस्मानाबाद यांच्याविरुध्द भादंवि कलम ४२९, ३४, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, प्राण्यांन परिवहन कलम, महाराष्ट्र पशूसंरक्षण कायदा, महाराष्ट्र पोलिस अधिनियम कायदा याअन्वये बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सदर कारवाई बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि महारूद्र परजणे यांनी पोकॉ सचिन नितनात, पोहकॉ भोसले, चालक पोकॉ पठाण यांच्यासह केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)