रोकड व दागिन्यांसह सापडलेली पर्स पोलीसांकडे सुपुर्द; बार्शीतील गॅरेजचालकाचा प्रामाणिकपणा

Admin
0

https://www.barshivishesh.in
Purse found with cash and jewelry handed over to police; Honesty of a garage owner in Barshi


बार्शी विशेष : प्रामाणिकपणा व माणुसकीचा प्रत्यय देणाऱ्या काही सुखद घटना अधूनमधून घडत असतात, त्यामुळे समाजाचा सत्यावरील विश्वास टिकून रहाण्यास मदत होत असते. अशीच एक घटना आज बार्शी शहरात घडली. गॅरेज समोरील रस्त्यावर दागिने व रोकड असलेली एक पर्स सापडल्यानंतर त्याबद्दल मोह न ठेवता, गॅरेज चालकाने ती पर्स बार्शी शहर पोलीस ठाण्यात जमा केली. राजू रशीद मोमीन (वय ५०) रा. ४२२, गाडेगांव रोड, बार्शी असे त्या प्रामाणिक गॅरेज चालकाचे नांव आहे. ही घटना मंगळावर दि १९ रोजी दुपारी १.१५ च्या सुमारास घडली. 

अधिक माहिती अशी की, राजू मोमीन हे त्यांच्या बार्शीतील परांडा रस्त्यावरील गांधी स्टॉप जवळ असलेल्या इंडिया गॅरेजमध्ये काम करत होते. त्यावेळी त्यांना गॅरेज समोरील रस्त्यावर एक पर्स पडल्याचे दिसले.  ती पर्स त्यांनी गॅरेजमध्ये आणून ठेवली. बराच वेळ वाट पाहूनही पर्स शोधत कोणीही न आल्यामुळे, मोमीन यांनी ती पर्स घेऊन पटेल नावाच्या मित्रासोबत बार्शी शहर पोलीस ठाणे गाठले. 

सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार व ठाणे अंमलदार पो.ना. योगेश इंगोले यांची भेट घेऊन त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती देऊन, त्यांनी ती पर्स सपोनि इज्जपवार यांच्याकडे सुपूर्द केली. मोमीन यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे दोघांनीही कौतुक केले. पर्सबाबत अधिक चौकशी पो. श्रीमंत खराडे करत आहेत.

पोलीसांचे आवाहन 

शहरातील परांडा रस्त्यावर गांधी स्टॉपजवळ इंडिया गॅरेजसमोर दुपारी १.१५ च्या सुमारास ज्यांची पर्स हरवली असेल त्यांनी ती पर्स त्यातील ऐवजाची ओळख पटवून बार्शी शहर पोलीस ठाणे येथून घेवून जावी असे आवाहन सपोनि स्वप्नील इज्जपवार यांनी केले आहे.

कष्ट व प्रामाणिकपणावर आपला विश्वास : मोमीन 

आपली एखादी गोष्ट हरवल्यानंतर त्याचे दु:ख काय असते याची मला जाणीव आहे. थोड्या दिवसापूर्वी माझ्या पत्नीचे दागिने हरवले होते. त्यावेळी खूप दु:ख झाले होते. तसे दु:ख संबंधितांना होवू नये अशी आपली भावना आहे. कष्ट व प्रामाणिकपणावर आपला विश्वास आहे. त्यामुळे मी  रोख रक्कम व दागिने असलेली पर्स परत केली. 

- राजू मोमीन, गॅरेज मालक, इंडिया गॅरेज, बार्शी

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)